कोल्हापूर: परखंदळे, गोठे, आकुर्डे, पनुत्रे, गवशी,गारीवडे गगनबावडा हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 39 म्हणून ओळखला जातो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारा हा रस्ता गगनबावडा, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यांना जोडणारा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक सुरू असते, शिवाय या तीनही तालुक्यातील साखर कारखान्यांना होणारी ऊस वाहतूकही प्रामुख्याने याच मार्गावरून होत असते.
सदरचा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण व्हावे अशी मागणी तीनही तालुक्यातील नागरिकांकडून होत होती. या रस्त्याच्या रुंदीकरणाची गरज लक्षात घेऊन माजी आमदार अमल महाडिक यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पडणारा वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे ही बाब महाडिक यांनी निदर्शनास आणून दिली होती. महाडिक यांच्या मागणीची दखल घेऊन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या रस्ते विकास योजनेतून या रस्त्याच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी तब्बल 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
केंद्राकडून राज्यातील विविध रस्त्यांसाठी सोळाशे कोटी रुपयांचा एकूण निधी आला असून या निधीमध्ये परखंदळे गगनबावडा रस्त्याचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण लवकरच होणार असून कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत आणि गतिमान होणार आहे.
या रस्त्याचे महत्त्व ओळखून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी आमदार अमल महाडिक यांनी त्यांचे आभार मानले आहेत. लवकरच या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल आणि तीनही तालुक्यातील ग्रामस्थांची गैरसोय दूर होईल असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला.