गारगोटी :भुदरगड तालुक्यातील गोर-गरीब रुग्णांना डायलेसीस उपचारासाठी कोल्हापूर येथे जावे लागत असल्यामुळे त्यांची वेळ व आर्थिक नुकसान होत होते. यामुळे तालुक्यातील रुग्णांना नव्याने सुरू झालेल्या उपजिल्हा रुग्णालय येथेच डायलेसीस उपचार मिळावेत यासाठी केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून उपजिल्हा रुग्णालय गारगोटीसाठी 3 डायलेसीस युनिट उपलब्ध झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, भुदरगड तालुक्याची वाढती रुग्णसंख्या विचारात घेता अस्थितत्वात असलेले ग्रामीण रुग्णालय अपुरे पडत होते. या 30 खाटांच्या रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपांतरण करणे गरजेचे होते याकरीता 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपांतरण करून याकरीता तब्बल 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सदरील रुग्णालयाचे काम पुर्ण झाले असून या रुग्णालयाचे लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या शुभहस्ते संपन्न झाले होते. या कार्यक्रम प्रसंगी आमदार प्रकाश आबिटकर यांनी सदर रुगणालयात डायलेसीस यंत्रणा सुरू करण्याची मागणी आरोग्य मंत्र्यांकडे केली होती. या मागणीच्या अनुषंगाने आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी सहसंचालक (तांत्रीक), मुंबई यांना उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथे डायलेसीस युनिट तात्काळ देण्याच्या सुचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथे डायलेसीस 3 युनिट मंजूर करण्यात आले असून या सेवा-सुविधांमुळे तालुक्यातील रुग्णांना चांगल्या व मोफत वैद्यकीय सुविधा मिळण्यास मदत होणार असल्याचे म्हटले आहे.