कोल्हापूर -सांगली जिल्ह्यातील पुराचे पाणी दुष्काळी विभागाकडे वळविण्याच्या प्रकल्पास निधी मंजूर

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. मात्र हेच पुराचे पाणी दुष्काळी मराठवाडा विभागाकडे वळविण्याचा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारला जागतिक बँकेकडून पहिल्या टप्प्यात चार हजार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी माध्यमांना दिली आहे.

चार वर्षांपूर्वी 12 सप्टेंबर 2019 रोजी राज्यातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची जागतिक बँकेच्या पथकाने पाहणी केली होती. पाहणीनंतर या पथकाची त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत एक बैठक पार पडली होती. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती कमी करून, मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रातील पाणी वळवण्याचे निश्चित झाले होते. त्यानंतर आता या प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून पहिल्या टप्प्यात चार हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक पार पडणार आहे. असेही राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.