कोल्हापूर (प्रतिनिधी) : एकाच भारतामध्ये एकीकडे भारत आणि इंडिया वसलेले असून त्यातील दरी संपवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे लागतील असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॅा. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
ज्येष्ठ शिक्षक, शिवभक्त, पत्रकार सु. रा. देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार डॅा. माशेलकर यांना सोमवारी राम गणेश गडकरी सभागृहात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेक्ष क्षीरसागर आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शाल, मानपत्र आणि धनादेश देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार जयश्री जाधव, न्यू एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार विनोदकुमार लोहिया उपस्थित होते.
सध्यस्थितीचा आढावा घेताना डॅा. माशेलकर म्हणाले, भारतामधील तिसऱ्या स्तरातील शहरांमध्ये राहणारे निम्मे लोक अजून गरीब आहेत. १०० पैकी २४ महानगरेच विकसित झाली असून देशातील प्रत्येक सहा व्यक्तींमागे एकजण झोपडपट्टीत रहात आहे. सहापैकी एकजण अजूनही निरक्षर आहे. या सर्वांना उन्नतीच्या मार्गावर आणण्याची गरज आहे. त्यामुळे एकीकडे अमृतकाळ साजरा करत असताना इंडिया आणि भारत यातील भेद संपवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. तसेच विश्वगुरू होण्याआधी आपल्याला विश्वमित्र व्हावे लागेल. सु. रा. देशपांडे यांनी एक शिक्षक, पत्रकार, शिवभक्त, संघटक म्हणून केलेले वैविध्यपूर्ण काम प्रेरणादायी आहे.
राजेश क्षीरसागर म्हणाले, देशपांडे यांच्या स्मृती जागवण्यासाठी देशपांडे परिवाराने आयोजित केलेला हा उपक्रम प्रेरणदायी आहे. सतेज पाटील म्हणाले, सु. रा. देशपांडे यांनी जीवनात एक विचार डोळ्यासमोर वाटचाल केली. ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असलेल्या देशपांडे यांनी त्या सोडवण्यासाठी त्यांच्यापरीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. डॅा. माशेलकर यांचा गौरव करण्याचे भाग्य आम्हांला मिळाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार वासुदेव कुलकर्णी, उदय कुलकर्णी, ज्येष्ठ इतिहास लेखक डॅा. रमेश जाधव, हिल रायडर्सचे संस्थापक प्रमोद पाटील, चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव यांचा डॅा. माशेलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समीर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. डॅा. सागर देशपांडे यांनी माशेलकर यांचा परिचय करून दिला. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध मान्यवरांसह आजरा, गडहिंग्लज, निपाणी, सावंतवाडी, चिपळूण, पुणे येथील अनेकजण उपस्थित होते.
असा असावा नवा भारत
स्त्रीपुरूषांना समान संधी देणारा, जातीपातीच्या पलिकडचा, सांस्कृतिकतेचा अभिमान असणारा परंतू इतर संस्कृती आणि धर्म यांचा आदर करणारा, योग्य शिक्षण, श्रीमंत गरीबातील दरी कमी करणारा आणि आनंदी असणारा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे असे डॅा. माशेलकर म्हणाले.