जालना : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आमचे धोरण असे आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मग हे असो नाहीतर ते… आम्हाला त्याचे काही देणेघेणे नाही. आमचे आरक्षण जवळपास होत आले आहे. ठीक आहे. त्यांना काय करायचे ते करू द्या. त्यांना शुभेच्छा, असे ते म्हणालेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच आरक्षणावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आले तर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवली जाईल. आमचे सरकार जातनिहाय जनगणनाही करेल, असे ते म्हणाले. याविषयी पत्रकारांनी मनोज जरांगे यांना छेडले असता त्यांनी राहुल गांधींना शुभेच्छा दिल्या.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राहुल गांधी आरक्षणावर बोलले. ठीक आहे. तो त्यांचा विषय आहे. आमचे आरक्षण आता मिळत आले आहे. जवळपास होत आले. त्यांना काय करायचे ते करू द्या. ते बोलल्याबद्दल त्यांना शुभेच्छा.