नाशिक : नाशिकमध्ये श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम जनसेवा प्रतिष्ठान आयोजित वारी आपल्या दारी, अभंग पंचविशी प्रकाशन आणि ग्रंथदान सोहळ्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना आमंत्रित करण्यात आले होते. मंत्री छगन भुजबळ हे या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर वारकरी पगडी परिधान करून बसलेले असताना मागून आलेल्या नरहरी झिरवाळ यांनी थेट त्यांच्यासमोर नतमस्तक होत लोटांगण घातले.
दरम्यान, विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी छगन भुजबळ यांना नाशिक मधील वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात वारकरी परंपरेनुसार लोटांगण घालून नमस्कार केला. झिरवाळ यांनी लोटांगण घालत काय आशीर्वाद मागितला आणि भुजबळांनी नेमका काय आशीर्वाद दिला याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री भुजबळ म्हणाले, संत तुकारामांचे अभंग बुडवण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण संतांचे विचार कधीही संपत नाहीत. संत तुकारामांनी रचलेले अभंग हे कधीही न भंगणारे आहेत. अंधश्रद्धेला त्यांनी कधीही खतपाणी घातले नाही. पण देवाप्रती आपली श्रद्धा असायला हवी, अशी शिकवण त्यांनी दिली. असे विधान यावेळी मंत्री भुजबळ यांनी केले. मात्र या ठिकाणी झिरवळ यांनी मंत्री भुजबळ यांच्या समोर घातलेले लोटांगण चर्चेचा विषय ठरला.