निवडणुकांसाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न करा : नरेंद्र मोदी

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. राजकीय विश्लेषकांच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न करा, असं पंतप्रधान मोदी मंत्र्यांना म्हणाले आहेत.सध्या देशात भाजपच्या बाजूने वातावरण तयार झाले आहे.

अनेक विश्लेषकांचा अंदाज आहे की पुन्हा एकदा भाजप बहुमत गाठेल. विशेषत: राम मंदिराच्या निर्मितीमुळे भाजपसाठी अनुकूल स्थिती निर्माण झालीये. पण, तरीही जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत शांत बसू नका, असा सल्ला मोदींनी दिला आहे.

२००४ च्या निवडणुकीपूर्वी देखील भाजपच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात ‘इंडिया शायनिंग’ला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. यावेळी अनेक भाजप नेत्यांनी थोडासा हलगर्जीपणा दाखवला होता. त्याचे परिणाम निवडणुकीत दिसून आले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसला भाजपपेक्षा सात जागा जास्त मिळाल्या. सर्वात मोठा पक्ष ठरुन काँग्रेसने सत्ता स्थापन केली आणि पुढील दहा वर्ष सत्तेत राहिली.

सध्या भाजपकडून ‘अबकी बार ४०० पार’चा नारा देण्यात आला आहे. पण, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा कोणताही निष्काळजीपणा दाखवू इच्छित नाहीत. त्यामुळे सर्वप्रकारचे प्रयत्न करुन भाजप वरचढ ठरु पाहात आहे. बिहारमधील नितीश कुमारांच्या जेडीयूसोबत सत्ता स्थापन करणे त्याचाच एक भाग आहे. ओडिशामध्ये देखील भाजप सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास यशस्वी झाला आहे

जागतिक पातळीवर पंतप्रधान मोदी यांचा दबदबा कायम आहे. शिवाय अर्थव्यवस्थेबाबत जागतिक देशांपेक्षा भारताची स्थिती चांगली आहे. केलेल्या कामांना जनतेपर्यंत पोहोचवण्यात भाजप यशस्वी होत आहे. असे असले तरी तिसऱ्यांना सत्तेत येण्यासाठी मोदींनी मंत्र्यांना पूर्ण झोकून देऊन काम करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक भाजप समर्थक मतदान करेल याकडेही लक्ष देण्यास नेत्यांना सांगण्यात आलं आहे.

भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. अद्याप इंडिया आघाडीमध्ये एकजुटता पाहायला मिळालीनाही. जागावाटपाचे घोडे अडले आहे. दुसरीकडे, भाजप फ्रंट फूटवर खेळत आहे. राम लल्लाच्या आशीर्वादामुळे पंतप्रधान मोदींनी हिंदी भाषिक राज्यात आपला मतदार पक्का केला आहे. दक्षिणेतील काही राज्ये आणि पश्चिम बंगालमध्येच भाजपला काहीचे आव्हानाला सामोरे जावे लागेल.