डॉ.रघुनाथ माशेलकर यांना सु.रा.देशपांडे स्मृती पुरस्कार जाहीर

कोल्हापूर( प्रतिनिधी)आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा (कै.) सु. रा. देशपांडे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि दुर्गप्रेमी शिक्षक सु. रा. देशपांडे फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ५ फेब्रुवारी २४ रोजी पुरस्कार वितरण हाेणार असल्याचे डॉ. सागर देशपांडे यांनी सांगितले. धनादेश, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

न्यू एज्युकेशन सोसायटीच्या गडकरी सभागृहात सोमवारी सायंकाळी ५ वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, श्रीमती स्नेहलता सुधाकर देशपांडे तसेच विनोदकुमार लोहिया यांची प्रमुख उपस्थिती असेल. ‘नवभारताच्या उभारणीसाठी’ या विषयावर यावेळी डॉ. माशेलकर आपले विचार या समारंभात मांडतील.

कै. सु. रा. देशपांडे हे कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत पत्रकार म्हणून सर्वपरिचित होते. तसेच संपादक, संघटक, कवी, इतिहासाचे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, दुर्गप्रेमी शिवभक्त आणि विविध सामाजिक उपक्रमांचे संयोजक अशी त्यांची बहुअंगी ओळख आहे.