मुंबई: जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.पोलिस स्टेशनमध्येच ही घटना घडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाने राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे.
आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय या कॉन्फिडन्समध्ये भाजपच्या एका आमदारने शिंदे गटाच्या नेत्यावर अंदाधूंद गोळीबार केला आहे. तोही पोलिस निरिक्षकांच्या केबिनमध्ये बसून , असं म्हणत शरद पवार गटाचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच एका गटाचा पदाधिकारी भरस्टेजवर भाजप आमदाराकडून थप्पड खातो.
दुसऱ्या गटाच्या पदाधिकाऱ्यावर भाजप आमदार गोळीबार करतो आणि दोन्ही गटाच्या नेत्यांकडून निषेधाचं साधं अवाक्षरही काढलं जात नाही. इकडून तिकडे गेलेल्या नेत्यांना सत्ता मिळाली पण कार्यकर्त्यांना काय मिळालं ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
दरम्यान, गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस चौकीत शिंदे गटातील माजी नगरसेवकावर गोळ्या झाडल्या. जमिनीच्या वादावरून धक्काबुक्की केल्याने त्यांनी गोळ्या झाडल्या असं त्यांचं म्हणणं आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुन्हेगारी पसरवत आहेत, राज्यात गुंड निर्माण करत आहेत, उद्धव ठाकरे यांच्या गद्दारी केली, आता भाजप संपवण्याचा ते प्रयत्न करत आहेत,’ असे गंभीर आरोप स्वतः गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड करत आहेत. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावरही गणपत गायकवाड यांनी मनमानी कारभाराचे आरोप लावले आहेत. भाजप संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षांचे आमदार आणि नेतेच जर अशी गुंडगिरी करणार असतील, तर जनतेने स्वतःचं संरक्षण कोणाकडून अपेक्षित करावं? या सरकारने महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली असून गुंड आणि हल्लेखोरांना डोक्यावर बसवले आहे, हेच या प्रकरणावरून दिसत आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.
या कॉन्फिडन्स मध्ये भाजपच्या एका आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर अंदाधुंद गोळीबार केला आहे, तेही पोलिस निरीक्षकांच्या केबिन मध्ये बसून.