नवी दिल्ली: भारतामधील एक लोकप्रिय व्यवहार प्रणाली युपीआय म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेसची (UPI) हळूहळू जगाला भुरळ पडत चालली आहे. याआधी भारत आणि फ्रान्समध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस संदर्भात करार झाला होता.
आता माहिती मिळत आहे की, भारतामधील लोक युपीआयच्या मदतीने फ्रान्समध्ये पेमेंट करू शकतील. फ्रान्समध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस पेमेंट मेकॅनिझम सुरू करण्यासाठी इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडने (NIPL) फ्रांसमधील ई-कॉमर्स आणि प्रॉक्सिमिटी पेमेंट्स सुरक्षित करणारी कंपनी Lyra सोबत हातमिळवणी केली आहे.
या उपक्रमाची सुरुवात आयफेल टॉवरपासून झाली आहे, जिथे भारतीय पर्यटक आता त्यांच्या युपीआय-समर्थित ॲप्सचा वापर करून ऑनलाइन तिकीट बुक करू शकतील. भारतीय पर्यटकांना त्यांच्या युपीआय ॲप्सचा वापर करून वेबसाइटवरील क्यूआर कोड स्कॅन करून सुरक्षित ऑनलाइन व्यवहार करू शकतात.
आयफेल टॉवरला भेट देणाऱ्यांमध्ये भारत हा दुसरा सर्वात मोठा देश आहे. लवकरच ही सेवा पर्यटन आणि किरकोळ उद्योगातील इतर व्यापाऱ्यांपर्यंत विस्तारली जाईल. यामुळे भारतीय पर्यटकांना फ्रान्समध्ये राहण्यासाठी हॉटेल, संग्रहालय भेटी आणि इतर सेवा दूरस्थपणे बुक करणे अधिक सोपे होईल.