नवी दिल्ली: शरद पवार त्यांच्या पुतण्यालाच कळले नाही, हे दुर्दैव आहे. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना लगावला.आव्हाड यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावरुन छगन भुजबळांवर टीका केली. भुजबळ कधीच सरकारबाहेर पडणार नाहीत. फक्त दोन कोंबडे झुंजवत ठेवायची सुपारी त्यांनी घेतली आहे, असा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीनंतर अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात सातत्याने शाब्दीक चकमक सुरु आहे. यात आव्हाड यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना चिमटा काढला. तसेच त्यांचे पुत्र पार्थ पवारांनाही आव्हाड यांनी लक्ष्य केले. पार्थ पवारांनी पुण्यातील गुंड गज्या मारणेची घेतलेली भेट ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. अजित पवारांनीही यावर सारवासारव केली होती. तोच धागा पकडुन पवार पिता पुत्रावर बोचरी टीका केली. गज्या मारणेच्या टोळीत जायचे आमंत्रण आले असेल म्हणुन (पार्थ पवारांनी) घरी जावून भेट घेतली असेल, अशी खिल्ली आव्हाड यांनी उडविली.
शरद पवारांच्या काँग्रेस सोडण्यावर अजित पवारांना वक्तव्य केले होते. त्यावर दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवार, तारिक अन्वर, पी. ए. संगमा यांनी काँग्रेस पक्ष सोडला नव्हता तर त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले होते. त्यांच्याकडे पर्याय नव्हता म्हणून त्यांनी पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. नंतर ते विचार म्हणुन काँग्रेससोबतच गेले. अजित पवार यांना बहुधा शरद पवार यांचा इतिहास माहीत नाही. शरद पवार त्यांच्या पुतण्यालाच कळले नाही, हे सगळ्यात मोठे दुर्दैव आहे. अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.
दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणात आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांच्या मागणीनुसार न्यायलयाने वेळ दिला असेल तर त्यात काही गैर नाही. मात्र अध्यक्षांनी निकाल व्यवस्थित द्यावा, ही आमची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. तसेच पक्षांतर विरोधी कायद्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे.
यावर बोलताना आव्हाड म्हणाले की, ज्यांनी १० व्या परिशिष्टाला हरताळ फासले त्यांना अध्यक्ष करणे म्हणजे मोठा विनोद आहे. दोन्ही गट पात्र आहेत असे म्हणणारे हे पहिलेच अध्यक्ष असतील हे, असेही आव्हाड म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाचा निकाल लवकर येणे अपेक्षित आहे मात्र तो का येत नाही हे अनाकलनीय असल्याचे ते म्हणाले.
रणजित सावरकरांच्या पुस्तकावरही जितेंद्र आव्हाड यांनी खरमरित टीका केली. ते म्हणाले की, “नेहरू गांधी यांना बदनाम करण्याचा कट अनेक वर्ष सुरू आहे. आता त्याला उत आला आहे. मात्र सबंध देशाला माहीती आहे की महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेने केली.
भारतातील पहिला अतिरेकी गोडसे होता. गोळ्या कोणी झाडल्या हे पाहणारे अनेक साक्षीदार होते, त्यातले एक काकासाहेब गाडगीळ होते. कदाचित काहींना ते मान्य नसावे. काही दिवसांनी महात्मा गांधीच हत्या झालेल्या ठिकाणी नव्हतेच असेही ते म्हणतील त्यामुळे ज्यांचा इतिहासाचा अभ्यास कमी आहे अशा लेखकांवर न बोललेल बरे, असा वाद निर्माण करून राज्यसभेवर जाता येईल का याची पडताळणी सुरू आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.