मानवी जीवनात गुरूंचे स्थान अत्यंत महत्वाचे : कीर्तनकार कांचनताई धनाले

 कागल (प्रतिनिधी) : मानवी जीवनामध्ये गुरूंचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. ज्यांच्या आयुष्यात गुरु नाही त्यांचे आयुष्यच व्यर्थ. जीवनात गुरूच नसेल तर मनुष्य जन्माला अर्थ काय?  देहातला गुरु फार श्रेष्ठ असतो. त्यांची सेवा करणे हे महाकठीण काम असले तरी आपल्या गुरूंना विसरण्याची जागा नरकातच असते असे प्रतिपादन ज्येष्ठ महिला कीर्तनकार कांचनताई धनाले यांनी केले. 
 
आयोध्या येथील ऐतिहासिक प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम मंदिर लोकोत्सव समिती कागल यांच्या वतीने येथील श्रीराम मंदिरामध्ये आयोजित केलेल्या किर्तन सोहळ्यामध्ये "आमचे आदर्श व  ध्येय प्रभू श्रीराम चरित्र" या विषयावर त्या बोलत होत्या.
    
आपल्या गोड आणि मधाळ वाणीतून निरूपण करताना  धनाले म्हणाल्या, प्रभू श्रीराम हे आमचे आदर्श आहेत.त्यामुळे आजच्या कलियुगामध्ये राम कथा चारही प्रहर ऐकल्या तरी त्या कथांमध्ये असणाऱ्या अविट गोडीमुळे कंटाळा येत नाही.  मानवी जीवनाचे कल्याण आणि जीवनातील मांगल्य या भोवतीच या कथांमध्ये अत्यंत परिपक्व सार  सामावलेले आहे. समाजामध्ये वाढती व्यसनाधीनता आणि चंगळवाद रोखण्यासाठी प्रसारमाध्यमांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
       
यावेळी नंदितादेवी घाटगे,विजया निंबाळकर, शितल घाटगे,सुधा कदम, मोनिका इंगळे,ज्योती प्रकाश पाटील,शोभा पाटील या मान्यवरांसह राम सेवा मंडळ आणि राम सेवा भजनी मंडळाचे कार्यकर्ते अबालवृद्ध,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
  
राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग तीन दिवस सुरू असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यास कागल शहरातील नागरिकांच्या "न भूतो न भविष्यती" अशा उच्चांकी गर्दीच्या साक्षीने अत्यंत भक्तीमय वातावरणात या सोहळ्याची सांगता महाआरतीने करण्यात आली.


" गीता " भगवंताच्या नामस्मरणाचे द्वार….
 जेष्ठ कीर्तनकार कांचनताई धनाले यांनी मानवी देहाचा वापर परमेश्वर प्राप्तीसाठी न करता एन्जॉय म्हणून केला जात असल्याबाबत खंत व्यक्त केली .भगवतगीतेच्या आठव्या अध्यायातील आठवा श्लोक हा मानवी जीवनात अत्यंत श्रेष्ठ आहे.त्यामुळे आजच्या कलियुगामध्ये भगवतगीता ही परमेश्वराच्या नामस्मरणाचे व प्राप्तीचे एक उत्तम द्वार आहे असे त्या म्हणाल्या .