मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह आज लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून सकाळपासून जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा बांधवांनी गर्दी केली आहे.हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी ही बैठक होणार आहे.
या बैठकीला मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.बैठकीत मराठा आरक्षणावर अंतिम चर्चा होणार असल्याचं देखील माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांसह लाखो मराठा बांधव मुंबईत धडकण्याआधीच राज्य सरकार मराठा आरक्षणावर तोडगा काढणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील मोर्चा टाळावा, राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊन आम्ही कायदा करणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का आम्ही लावणार नाही, हा शब्द सरकारचा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे जरांगे मात्र, आपल्या इशाऱ्यावर ठाम असून त्यांनी मुंबईत येण्याची तयारी केली आहे. त्यामुळे जरांगे मराठा बांधवांसह मुंबईत धडकणार? की त्याआधीच सरकार मोठा निर्णय घेणार? याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.