शियेत श्री राम मंदिर मंगल अक्षता कलशाचा पालखी सोहळा उत्साहात

शिये (वार्ताहर) : ( ता. करवीर ) येथे अयोध्येतील राममंदिर मंगल अक्षता कलशाचा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात झाला. आयोध्यातून राम लल्ला प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी या मंगल अक्षता कलशाचे गुरुवारी सायंकाळी शियेेेत आगमन झाले.

त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात अक्षता कलशाची पालखी निघाली. पालखी मार्गावर ग्रामस्थांच्या वतीने सडा, रांगोळी काढण्यात आली होती. रस्त्याच्या दुतर्फा महिलांनी व ग्रामस्थांनी फुलांचा वर्षाव करत दर्शन घेतले. चौका – चौकात तरुण मंडळाच्या वतीने प्रभू श्री राम प्रतिमा पूजन करून फटाक्याच्या आतिषबाजी कलशाचे स्वागत करण्यात येत होते.

मंगल कलश पालखी हनुमान नगर, श्री रामनगर, शिवाजीनगर, विठ्ठल नगर, माळवाडी या परिसरातून प्रदक्षिणा घालत गाव भागात पोहोचली. पालखी सोहळा गावात आल्यानंतर करवीर तालुका संघचालक शशिकांत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. सुमारे पाच तास चाललेल्या या भक्तिमय पालखी सोहळ्याची सांगता ग्रामदैवत हनुमान मंदिरात महाआरतीने झाली. यावेळी गावातील विविध संस्थांची पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706