कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना काही गुंडांनी अमानुष मारहाण केली. यामध्ये चिटणीस जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांच्यासह सात ते आठ जणांना अटक केली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले.
राज्यभरातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम करणाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशनने साखर आयुक्तांना काम बंदचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांची एक प्रकारे सेवा करणाऱ्या कार्यकारी संचालकांवर हल्ला करण्याचा हा प्रकार निंदनीय आहे. कारखान्यामधील हजारो कर्मचारी, शेतकरी सभासद, ऊस तोडणी कामगार, कारखाना व्यवस्थापन आणि शासनामधील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्यकारी संचालक काम करत असतात. पण कार्यकारी संचालकाला कोणतेही संरक्षण नसल्यामुळे अनेकदा दमदाटी, अपमान सहन करावा लागतो. पण कोल्हापुरात घडलेला हा प्रकार म्हणजे कार्यकारी संचालक पदाचा अवमान आहे.
प्रकाश चिटणीस यांना झालेल्या अमानुष मारहाणीमुळे सर्वच सहकारी साखर कारखान्यांमधील कार्यकारी संचालक संतप्त झाले असून मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अन्यथा काम बंद आंदोलन करून उपोषणाला बसण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे. साखर आयुक्तांना दिलेल्या पत्रावर अध्यक्ष राजेंद्र रणवरे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी आणि सेक्रेटरी संजीव देसाई यांच्या सह्या आहेत.