भाजपच्या नवनियुक्त कार्यकारिणीच्या नियुक्तीपत्रांचे खास. धनंजय महाडिक यांच्या हस्ते वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या, जिल्हा कार्यकारिणीमध्ये ५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची नियुक्ती झाली. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते, या पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. नूतन पदाधिकार्‍यांनी पक्षाचे शिलेदार म्हणून काम करावे आणि आपल्यावर सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, त्यातून सामान्य नागरिकांसह शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवावेत, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले.

फेबु्रवारीच्या दुसर्‍या आठवडयात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय. त्यासाठी नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमध्ये सांगड घालत, पक्षाच्या विविध पदांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपच्या किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणीमध्ये ५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची वर्णी लागलीय. अजितसिंह चव्हाण, लक्ष्मण पाटील, रमेश सावंत, बाबासाहेब पाटील, केरबा माने, विजय उपाध्ये, राजगोंडा पाटील, प्रकाश पाटील, नामदेव साळोखे, गणेश माने, रमेश मगदुम, विष्णू काटकर यांच्यासह ५० कार्यकर्त्यांना विविध जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत. या सर्वांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.
यावेळी ४० ते ४५ युवकांनी, भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचेही स्वागत खासदार महाडिक यांनी केले. यावेळी खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ९ वर्षातील कामगिरीचा आणि देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे सर्वच क्षेत्रात देशाची वेगवान प्रगती सुरू आहे.

मोदी यांनी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ कोटयवधी नागरिकांना मिळत असल्याने, २०२४ च्या निवडणुकीत भाजप संपूर्ण बहुमताने निवडून येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. भाजपला यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाचे शिलेदार म्हणून काम करावे, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले.
यावेळी राजवर्धन नाईक-निंबाळकर, भगवान काटे, शिवाजीराव बुवा, अजितसिंह काटकर, नामदेव पाटील, सुरेश बेनाडे, आनंद गुरव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.