कामगारांच्या कलागुणांना वाव देणारा अत्यंत स्तुत्य उपक्रम – आम.जयश्री जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) कामगारांना व्यासपीठ देऊन त्यांच्या कलागुणांना जागा निर्माण करून देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. कोल्हापूरमध्ये मागील तीन वर्षापासून सुरु असणारी ही विभागीय स्पर्धा अत्यंत कसोशीने सुरु आहे. कामगार कलावंतांना या निमित्ताने कलेची सेवा करता येते हे महत्वाचे. असे उद्गगार आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केले. त्या केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ६९ वा नाट्य महोत्सव प्राथमिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ रंगकर्मी शरद भुथाडिया हे उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या हौशी नाट्य स्पर्धेपेक्षाही सात वर्ष जुनी असणारी ही स्पर्धा आहे याबाबत आनंद व्यक्त केला. कष्टकरी समूहाला आपल्या भावभावना व्यक्त करता येणे ही जमेची बाजू आहे. असे मत त्यांनी मनोगतात व्यक्त केले.
प्रमुख उपस्थितीत असणारे गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी कामगारांच्या उपक्रमांसाठी कोल्हापुरात कामगार भवन निर्माण व्हायला हवे असे मत व्यक्त केले.

प्रसंगी स्पर्धा परीक्षक नरहर कुलकर्णी, रविदर्शन कुलकर्णी, मदन दंडगे हे जेष्ठ रंगकर्मी उपस्थित होते. जिल्ह्यातील गुणवंत कामगार, रंगकर्मी, पत्रकार, इतर मान्यवर उपस्थित होते.ही स्पर्धा २ ते २५ जानेवारी सायंकाळी ७ वाजता असणार आहे. सर्वांना प्रवेश मोफत असणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी केले. तर पाहुण्यांचे आभार कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी तर निवेदन केंद्र संचालक सचिन आवळेकर यांनी केले.
उद््घाटन कार्यक्रमानंतर स्पर्धेतील पहिले नाटक “युगे युगे शहामृगे” सादर झाले.
कार्यक्रम आयोजनात चंद्रकांत घारगे, सचिन खराडे, दिपक गावराखे, संघसेन जगतकर, सचिन शिंगाडे, विजय खराडे, अशोक कौलगी, व सर्व कर्मचारी उपस्थित होते.