डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प ‘अन्वेषण’ मध्ये अव्वल

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘अन्वेषण’ (पश्चिम विभाग) विद्यार्थी संशोधन महोत्सवात डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचा दोन विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांना प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.

भारतीय विद्यापीठ महासंघ, दिल्ली (एआययू)आणि शिवाजी विद्यापीठ संगणकशास्त्र अधिविभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ‘अन्वेषण’ चे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील तरुणाईमध्ये संशोधकीय दृष्टीकोन आणि सृजनशीलता यांना चालना देण्याच्या हेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

या महोत्सवात पदवी स्तरापासून ते पीएचडी संशोधकांपर्यंतच्या अभिनव संकल्पनांवर आधारित संशोधन प्रकल्पांचा समावेश होता. पश्चिम विभागामधील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात व राजस्थान या पाच राज्यांतील ११ विद्यापीठांच्या एकूण १०८ संशोधक विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभाग घेतला. त्यांनी एकूण ६४ संशोधन प्रकल्प सादर केले. यामध्ये डी वय पाटील अभिमत विद्यापीठाच्य मूलभूत विज्ञान व उपयोजित विज्ञान विभागात सर्गुण तुषार बासराणी तर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागात लीना चौधरी यांच्या मेफ्लोक्विन इनहबीटेड एल्गोस्टीरॉइड बायोसेंथेसिस कँडिडा अल्बिकॅन, टिश्यु इंजिनिअर्ड ईअर पिना या दोन प्रकल्पाना प्रथम क्रमांक पटकावला.

यावेळी एआययू सहसंचालक व संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. अमरेंद्र पाणी, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, एआययूच्या सहाय्यक संचालक डॉ. उषा राय नेगी आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड उपस्थित होते.

 कार्यक्रमास विषयतज्ज्ञ, संघ प्रमुख, देशभरातून आलेले परीक्षक, समन्वयक संघातील शिक्षक, प्रशासकीय सेवक, पश्चिमा विभागातील पाच राज्यांतून आलेले संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विद्यार्थ्यांना रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ. अर्पिता तिवारी- पांडे, डॉ. मेघनाद जोशी, डॉ. आश्र्विनी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल कुलपती डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ विश्वनाथ भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.