प.पू.इंदूमती राणी सरकार यांनी दिलेल्या जमिनी शासनाने संबधित शेतकऱ्यांना मालकी हक्काने कायमस्वरूपी द्याव्यात : राजे समरजितसिंह घाटगे

कागल,(प्रतिनिधी) : कसबा सांगाव (ता.कागल)येथे सन १९२२साली छत्रपती शाहू महाराज यांनी प.पू. इंदुमती राणी सरकार यांना जमिनी दिल्या होत्या.त्यांच्याकडून धनगर समाज व इतर लोकांना १९४९-५०पासून संरक्षित कुळ म्हणून या जमिनी दिल्या होत्या.त्या कायमस्वरूपी मालकी हक्काने संबधित शेतकऱ्यांना मिळाव्यात.अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी मुंबई येथे भेटून निवेदनाद्वारे केली.त्यास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अनूकुलता दर्शविली आहे.अशी माहिती घाटगे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी.कसबा सांगाव (ता.कागल)येथे धनगर समाज व इतर अनेक लोकांना प.पु.इंदूमती राणी सरकार यांचेकडून १९४९-५०पासून बऱ्याच जमिनी शेती व मेंढपाळ व्यवसाय करण्यासाठी मिळाल्या आहेत.त्यापैकी काही जमिनी या भोगवटादार वर्ग दोनमध्ये रूपांतरित झाल्या.त्या शेतकरी कसत आहेत. अशा शेतकऱ्यांची संख्या सर्वसाधारणपणे शंभरहून अधिक असून त्यांच्याकडे असलेल्या दोनशे एकरहून अधिक एकर जमिनीचा हा प्रश्न आहे.

या सर्व जमिनी शासन नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना भोगवटादार एकमध्ये वर्ग करून कायमस्वरूपी मालकी हक्काने मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी हे शेतकरी गेली अनेक वर्षे शासन पातळीवर प्रयत्न करत आहेत.मात्र त्यामध्ये त्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे शासकीय कामी त्यांना अडचणी येत आहेत.

या जमिनी या शेतकऱ्यांच्या मालकीच्या झाल्यास या सर्व अडचणी कायमस्वरूपी मिटणार आहेत. त्या संबधित शेतकऱ्यांना मालकी हक्काने कायमस्वरूपी मिळाव्यात.अशी आग्रही मागणी श्री.फडणवीस यांच्याकडे घाटगे यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही दिले आहे.