पाकिस्तानमध्ये निवडणुकीसाठी हिंदू महिलेचा अर्ज ; लोकसभेच्या या जागेकडे अवघ्या देशाचे लक्ष

कराची : पाकिस्तानमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एका हिंदू महिलेने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही महिला पेशानं डॉक्टर आहे. पाकिस्तानात लोकसभा निवडणुकीसाठी एका हिंदू महिलेनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं हा देशात चर्चेचा विषय बनला आहे.या लोकसभेच्या जागेकडं अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. ही महिला निवडून येणार का याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. 

8 फेब्रुवारी 2024 ला पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत खैबर पख्तुनख्वाच्या बुनेर जिल्ह्यातल्या एका सर्वसाधारण जागेसाठी पहिल्यांदाच एका हिंदू महिलेनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, बुनेर जिल्ह्यातल्या पीके-25 च्या सर्वसाधारण जागेसाठी सवेरा प्रकाश या हिंदू महिलेनं तिचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हिंदू धर्मातल्या सवेरा प्रकाश वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. सवेरा प्रकाश यांच्या वडिलांचे नाव ओमप्रकाश असून, ते निवृत्त डॉक्टर आहेत. ते पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सदस्य होते.

काय म्हणाल्या सवेरा प्रकाश?

सवेरा प्रकाश यांनी डॉनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून परिसरातल्या वंचितांसाठी काम करील. मी 23 डिसेंबर 2023 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि पीपीपीचं वरिष्ठ नेतृत्व माझ्या उमेदवारीला पाठिंबा देईल, अशी आशा आहे. मानवतेची सेवा करणं माझ्या रक्तात आहे. मेडिकलचं शिक्षण घेत असताना आमदार होण्याचं माझं स्वप्न होतं. मला सरकारी रुग्णालयातलं वाईट व्यवस्थापन आणि असहायता दूर करायची आहे.’ दरम्यान, पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या अलीकडच्या सुधारणांनुसार सर्वसाधारण जागांवर पाच टक्के महिला उमेदवारांचा समावेश करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

डॉनच्या रिपोर्टनुसार, खैबर पख्तुनख्वाचे स्थानिक नेते सलीम खान यांनी सवेरा प्रकाश यांच्या उमेदवारीबाबत बोलताना सांगितलं, की ‘बुनेरमधून आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्या सवेरा प्रकाश या पहिल्या महिला आहेत. सवेरा प्रकाश यांनी 2022मध्ये अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. त्या पाकिस्तान पीपल्स पार्टी महिला विंगच्या सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. सवेरा प्रकाश यांनी महिला विंगच्या सरचिटणीस म्हणून काम करताना समाजाच्या कल्याणासाठी त्यांची बांधिलकी दाखवली आहे. त्यांनी महिलांच्या भल्यासाठी काम केलं आहे. याशिवाय पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचं कामही त्यांनी केलं आहे. निवडून आल्यास महिलांशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्याचे त्यांचे ध्येय आहे.’

दरम्यान, पाकिस्तानच्या लोकसभा निवडणुकीत सवेरा प्रकाश विजयी होतात का, याकडे आता अनेकांचं लक्ष लागलं आहे.