करवीर: गांधीनगर येथे एका व्यापाऱ्याने आपल्या जागेमध्ये कचरा टाकू नये यासाठी गांधीनगर ग्रामपंचायतच्या नावे ‘येथे कचरा टाकू नये’ या आशयाचे फलक लावले आहे. व त्यामध्ये देवदेवतांच्या प्रतिमा असलेला फलक ही लावलेला आहे. ही गोष्ट कळताच शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे) करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी घटनास्थळी जाऊन याची पाहणी केली. व याबाबत संताप व्यक्त केला.
यावेळी गांधीनगर ग्रामपंचायत मधील सदस्यांना घटनास्थळी बोलवून याबाबत विचारणा केली असता ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले की, असा फलक लावण्यासाठी कोणतीही परवानगी संबंधित व्यापाऱ्याला दिलेली नाही. त्या व्यापाऱ्याने परस्पर हा फलक लावलेला आहे. यावेळी संबधित व्यापाऱ्याला याबाबत जाब विचारला व देवदेवतांच्या प्रतिमा असलेले फलक काढण्यास भाग पाडले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी सांगितले की, देवदेवतांच्या प्रतिमा असलेले फलक लावून त्यांची विटंबना झाली तर ते सहन केले जाणार नाही. यापुढे अशी घटना घडली तर संबंधितांना सेना स्टाइलने उत्तर देऊ व अशी विटंबना सहन केली जाणार नाही. असा सज्जड इशारा संबंधित व्यापाऱ्याला दिला. यावेळी त्या व्यापाऱ्याने याबाबत माफी मागून अशी घटना परत घडणार नाही असे सांगितले. पोलीस प्रशासनाने ही अशाप्रकारे कोणी देवदेवतांची विटंबना करत असेल तर अशा लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करवीर शिवसेनेने केली.
यावेळी वळीवडेचे ग्रा. पं. सदस्य वैजुनाथ गुरव हे उपस्थित होते.