मुम्बई: राज्यात मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात देण्यात आलेली डेडलाईन आता उद्या संपणार आहे. त्यातच सरकारकडून याबाबत ठोस पाऊल उचलले नसल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत असताना भाजपकडून या आरक्षणाविषयी मोठे विधान करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत माजी सहकारमंत्री तथा भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी मोठे विधान केले आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय 24 डिसेंबरपर्यंत होणे शक्य नाही, फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वांनी संयम राखावे, असे सुभाष देशमुख म्हणाले आहे. त्यामुळे त्यांच्या याच वक्तव्यावर आता पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोलापूर माध्यमांशी संवाद साधताना सुभाष देशमुख यांनी,”आरक्षणाच्या बाबतीत सभागृहात अनेक आमदारांनी आपले मत व्यक्त केले आहे. किमान 70 ते 80 आमदारांनी आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्वतः आपले मत व्यक्त केले. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्यामुळे त्यांना दिलही गेलं पाहिजे. शिंदे समितीने आपला अहवाल सादर केला आहे, त्यानंतर त्या अहवालाचे अवलोकन होईल आणि ते मंत्रिमंडळ समोर सादर केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवून निर्णय घेतला जाईल. त्यामुळे, 24 डिसेंबरपर्यंत याबाबत निर्णय होणे शक्य नाही, कारण अहवाल आता प्राप्त झाला आहे,” असे म्हटले.
पुढे देशमुख यांनी, “आरक्षण दिल्यानंतर ते रद्द होऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे, फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वांनी संयम राखावे, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि आरक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावे असेही देशमुख म्हणाले. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो काही 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे, त्या वेळेत आरक्षण देणे शक्य होणार असे मला वाटत आहे, असे म्हटले.
तसेच गेल्या 40 ते 45 वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न रखडलेला आहे. 24 डिसेंबरला तो मार्गी लागणार नाही. अजून अहवाल सादर करण्याचे बाकी होते आणि तो आत्ता सादर झाला आहे. यावर कॅबिनेट आणि त्यानंतर पुन्हा अधिवेशन घ्यावे लागणार आहे. कारण आरक्षण देतांना ते टिकले पाहिजे. दिलेले आरक्षण पुन्हा रद्द होऊ नयेत याची देखील सर्वांनी नोंद घेण्याची गरज आहे. आरक्षण देतांना खूप अभ्यासपूर्वक द्यावा लागणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात जो विशेष अधिवेशन बोलवण्यात आला आहे, तोपर्यंत सर्वांनी संयम ठेवला पाहिजे, असेही सुभाष देशमुख म्हणाले.