कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते शुभारंभ

कडगांव( वार्ताहर ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसोबत झालेल्या बैठकीमध्ये राधानगरी विधानसभा मतदार संघातील सिंचनाच्या कामांना कोट्यावधी रुपयांचा मान्यता मिळालेली आहे. याची सुरवात वासनोली प्रकल्पाच्या बंदिस्त नलिका वितरण कामापासून सुरू होत असून या बंदीस्त नलिका वितरण प्रणालीचे काम पुर्ण झालेल्यानंतर वासनोली पंचक्रोशतील 100 ते 150 एकर जमीन ओलिताखाली येणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

ते वासनोली लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कोकण केसरी के.जी.नांदेकर अध्यक्षस्थानी होते.

यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, वासनोली लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये सन 2019 पासून पाणीसाठी करण्यात आला. या 190 मी. लांबीच्या व 28 मी उंचीच्या धरणामध्ये 999 सघमी पाणीसाठी करण्यात आला आहे. प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येणार खुले कालवे आणि वितरिकांमुळे भूसंपादनासह वाढणारा बांधकाम खर्च टाळण्यासाठी कालवे न करता बंदिस्त नलिका वितरण प्रणाली सुरू करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली बंदिस्त पाईप वितरण प्रणाली ही आपल्या मतदार संघातील वासनोली प्रकल्पाला होत आहे. हे काम पुर्ण झाल्यानंतर अंदाजे 100 ते 150 एकर जमीन ओलिताखाली येणार असून यामुळे शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना जलसंधारण अधिकारी श्री.आजगेकर म्हणाले, जलसंधारण विभागांतर्गत बंदीस्त पाईपव्दारे पुर्ण होणार जिल्ह्यातील ही पहिलीच योजना आहे. यामुळे कामामुळे पाण्याची बचत, पाणी व्यवस्थापन, वाढीव लाभक्षेत्र, विना विज पाणीपुरवठा यासह अनेक फायदे होणार असून याचा नक्कीच शेतकरी बांधवांना चांगला फायदा होणार असल्याचे म्हणाले.

यावेळी कोकण केसरी के.जी.नांदेकर, माजी सभापती पांडूरंग पाटील, बाजार समितीचे संचालक संदीप वरंडेकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.आजगेकर, शिवसेना तालुकाप्रमुख संग्राम सावंत, सरपंच नंदा मानसिंग पाटील, शहाजी देसाई कडगांव, अजित देसाई, रामराव डेळेकर, शेखर पोतदार, राजू देसाई, माजी सरपंच दत्तात्रय पाटील, धनाजी पाटील, केरबा पाटील, भिकाजी पाटील, धनाजी पाटील, खंडेराव ढेकळे, कृष्णात चौगले यांच्यासह प्रमुख मान्यवर व शेतकरी बांधव उपस्थित होते. प्रस्ताविक मानसिंग पाटील यांनी केले तर आभार धनाजी पाटील यांनी मानले.