अमेरिकेत राष्ट्रपतीपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांचे मतदारांना सडेतोड उत्तर…

वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्रपतीपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांना हिंदू धर्माबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. टाऊनहॉल बैठकीत एका मतदाराने त्यांना प्रश्न विचारला होता.

अमेरिकेच्या संस्थापकांनी ज्या धर्माच्या आधारे या राज्याची स्थापना केली आहे. त्या धर्माशी तुमचा धर्म मेळ खात नाही. त्यामुळे, तुम्ही आमचे राष्ट्रपती कसे बनू शकता. या लोकांच्या प्रश्नांना तुम्ही काय उत्तर द्याल, असं मतदाराने विचारले होते.

रामास्वामी यांनी यावर उत्तर देताना म्हटलं की, मी एक हिंदू आहे. मी माझी ओळख खोटी सांगणार नाही. हिंदू धर्म आणि ख्रिश्चन धर्मामधील मूल्ये सारखी आहेत. माझ्या धार्मिक विश्वासावरुन सांगतो की प्रत्येक मनूष्य या ठिकाणी काही कारणासाठी असतो आणि ते पूर्ण करणे हे आपलं नैतिक कर्तव्य असतं. ईश्वर हा आपल्या प्रत्येकांमध्ये असतो. ईश्वर आपल्या माध्यमातून विविध पद्धतीने काम करत असतो. पण, आपण सर्व सारखे असतो.

माझ पालन हे पारंपरिक पद्धतीने झालं आहे. माझ्या आई-वडिलांनी मला सांगितलंय की विवाह पवित्र असतो, परिवार समाजाचा कणा असतो. लग्नाआधी संयम व्यवहार्य असतो, व्यभिचार चूक आहे. आयुष्यात सुखांचा आनंद घेण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, असं रामास्वामी म्हणाले आहेत. ३८ वर्षीय रामास्वामी दक्षिण पश्चिम ओहियोचे मूळ रहिवाशी आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी केरळमधून अमेरिकेत स्थलांतर केले होते.

विवेक रामास्वामी असंही म्हणाले की, ते हिंदू आस्थेचे काही मुल्य ज्यू आणि ख्रिश्चन धर्मात असल्याचं पाहतात. पण, ते ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी सर्वश्रेष्ठ राष्ट्रपती ठरणार नाहीत. दरम्यान, अमेरिकेत पुढील वर्षी अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत. त्याआधीपासूनच देशात निवडणुकीचे वातावरण तापू लागलं आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांची अध्यक्ष पदासाठीची लढाई कठीण मानली जात आहे.