जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक पण….

नागपूर : जुनी पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक असून सरकारी कर्मचाऱ्यांनी संप करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मंगळवारी विधानभवनावर लाखों कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीचा मोर्चा घेऊन गेले.आमदार विक्रम काळे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला असता उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जुनी पेन्शन योजनेसंदर्भात मार्ग काढण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. या अहवालातील शिफारसींसंदर्भात सरकारची भुमिका आणि कर्मचारी संघटनांशी चर्चा केली जाईल. परंतू, केवळ एका चर्चेतून यावर मार्ग निघणार नाही.”हा प्रश्न महत्त्वाचा असला तरी तो अगदी उद्या ऐरणीवर आला आहे अशी परिस्थिती नाही. 

जुन्या पेन्शनची मागणी करणारे लोक हे २०३२ नंतर निवृत्त होणार आहेत. त्यामुळे सरकारने याबाबत सकारात्मक पाऊल उचललं आहे. सरकारचं मत आणि संघटनांचं मत याबद्दल चर्चा करुन अंतिम निर्णयावर यावं लागेल. सरकारी कर्मचाऱ्यांनी संप केला तर त्याचा त्रास सरकारला कमी आणि सामान्य माणसाला अधिक होतो. सरकार या विषयावर सकारात्मक आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी संप करू नये,” असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.