मोदींचा गुरुच रस्त्यावर उतरला आहे, त्यामुळे ही निर्यात बंदी मागे घेतली पाहिजे : राजू शेट्टी 

 मुंबई : केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड याठिकाणी रास्ता रोको आयोजित करण्यात आला होता.या रास्ता रोकोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी केंद्र सरकारवर टीका केली.

 “देशाचे धोरण ठरवणाऱ्या भाजपा सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत देण्याची भावना नाही. सरकारचा निर्णय शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारा असून आजच्या आंदोलनामुळे दिल्लीतील राज्यकर्त्यांची झोप उडणार आहे”, असेही शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या टीकेवर आता स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनीही केंद्र सरकार आणि खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना, “स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांना शेतीतीतल गुरू मानतात. त्यामुळे आता आपला गुरुच रस्त्यावर उतरला आहे, त्यामुळे ही निर्यात बंदी मागे घेतली पाहिजे”, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.त्यांनी पुढे बोलताना, “स्वाभिमानी पक्षाने सुरुवातीपासूनच वाढवलेल्या निर्यात शुल्काला विरोध केला आहे आणि निर्यात बंदीलाही विरोध केला आहे.” असे म्हणत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, शेतकरी संकटात असताना मदत करण्याऐवजी भाजप सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला. नाशिकची द्राक्षे बांगलादेशात जातात. त्या देशाने द्राक्षांवर १६० रुपयांचे आयात शुल्क लागू केले. एवढासा देश आमच्यावर कर बसवतो आणि आमचे सरकार बघत नाही. असेच कर लागू केले गेल्यास शेतकरी वाचू शकणार नाही, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीवर घातलेल्या बंदीमुळे आणखी अडचणी निर्माण झाल्याचे शरद पवारांनी रास्ता रोकोदरम्यान म्हटलं.

दरम्यान, कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर तीन दिवसांनी जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्ववत झाले. पण, उन्हाळ आणि लाल कांद्याच्या दरात एक ते दीड हजार रुपयांनी घसरण झाली. गुरुवारी लासलगाव बाजारात लाल कांद्याला सरासरी ३३६० तर उन्हाळ कांद्याला ३६०० रुपये दर मिळाले होते. सोमवारी तेच दर लाल कांद्याचे २२६० तर, उन्हाळ कांद्याचे २४६० रुपयांपर्यंत खाली आले.