दादागिरीला दादागिरीने उत्तर देवु ; छगन भुजबळ यांचा जरांगेना इशारा…

पुणे : मनोज जरांगेसाठी कायदा नाही का? जरांगे केंव्हाही सभा घेतात, रात्री आपरात्री ते बैठका आणि सभा घेतात. पोलिसही त्यांच्यावर कारवाई करत नाही. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केला.पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात त्यांची सभेदरम्यान ते बोलत होते.

भुजबळ पुढे म्हणाले, जालन्यात पोलिसांवर दगडफेक केली होती. महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकला. त्यानंतर पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी लाठीमार केला होता. याबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तर दिले आहे. मी दोन महिन्यांपासून हे सांगत होतो पण काल फडणवीस विधानसभेत बोलले. राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ला केले गेले. आम्हाला बोलू नका, बोलताना नीट बोला. नाहीतर आम्ही दादागिरीला दादागिरीने उत्तर देऊ. पोलिसांनी वेळ आहे तोपर्यंत कारवाई केली पाहिजे नाहीतर पुन्हा याचे परिणाम भोगावे लागतील.

मराठा समाजाला आमचा विरोध नाही. पण वाढत्या झुंडशाहीला आमचा विरोध असल्याचे भुजबळ म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांना कुणबी सर्टिफिकेट पाहिजे आहे का? त्यांनी बोलले पाहिजे. यांची मागणी सरसकट मराठा समाजाला आरक्षण हवे आहे. तसं झालं तर महाराष्ट्रत एकही मराठा शिल्लक राहणार नाही. 

तू सरपंच तर होऊन दाखव…

मनोज जरांगेंनी नारायण कुचेंच्या शारीरिक व्यंगावर टीका केली. अशी टिंगल करणे चुकीचे आहे म्हणत त्याची ऑडिओ क्लिप ऐकवली. पुढे भुजबळ म्हणाले, जरांगे पाटील अकलेनं दिव्यांग आहेत. हा मला काहीही बोलतो. १९८५ ला मुंबईचा महापौर आणि आमदार दोनदा झालो होतो. तसेच हिंदुस्तानातील महापौरांचा अध्यक्षही झाला होतो. अरे तु ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव, असं आव्हान भुजबळ यांनी जरांगेंना दिले.

मग कशाला शुद्रामध्ये येताय…

पोलिसांनी वेळेवर कारवाई केली पाहिजे. त्यामुळे सरकार आणि पोलिसांनी पाऊल उचलले पाहिजे. नाहीतर भयंकर परिस्थिती होईल. त्यांना सर्व मुभा दिली आहे, हा कोणता कायदा आहे, असा प्रश्न भुजबळ यांनी विचारला. मी दौऱ्यावर गेल्यानंतर तो रस्ता गोमुत्राने धुवून काढला. आम्ही शुद्र आहोत म्हणून अशी कृती केली गेली. मग कशाला आमच्या शुद्रांमध्ये येताय, असं भुजबळ म्हणाले.