भुदरगड तालुक्यातील मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह बांधणेसाठी निधी मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी( प्रतिनिधी ) : भुदरगड तालुक्यातील मागासवर्गीय मुलां-मुलींकरीता गारगोटी (फणसवाडी) येथे शासकीय वसतीगृह बांधण्यासाठी प्रत्येकी 17 कोटी 5 लाख या प्रमाणे 34 कोटी 10 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून हिवाळी पुरवणी अधिवेशनामध्ये या दोन्ही कामांना प्रत्येक 1 कोटी 70 लाख प्रमाणे 3 कोटी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे वसतीगृह बांधकामाचा लवकर शुभारंभ करणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे त्याचप्रमाणे अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आलेली आहेत. भुदरगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मागसवर्गीय समाजातील युवक-युवती गारगोटी येथे शिक्षणासाठी येत असतात. त्यांना राहण्यासाठी चांगल्या पध्दतीची सोय नसल्यामुळे त्यांची अडचण होत होती. यामुळे विद्यार्थ्यांच्या सोईकरीता शासकीय वसतीगृह बांधणेसाठी निधी मिळावा याकरीता गेली 5 ते 7 वर्षापासून पाठपुरावा सुरू होता. यापाठपुराव्यास यश आले असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दि.21 जुलै 2023 रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार प्रत्येकी 17 कोटी 5 लाख याप्रमाणे 34 कोटी 10 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली होती.

 या कामांना सुरवात करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. याकरीता पाठपुरावा सुरू होता या पाठपुराव्यास यश आले असून या दोन्ही वसतीगृहांच्या बांधकामाकरीता प्रत्येक 1 कोटी 70 लाख या प्रमाणे 3 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यानिधीतून गारगोटी (फणसवाडी) येथे बांधण्यात येणारी वसतीगृहे ही सर्व सुविधांनी युक्त, मुला-मुलींसाठी सुरक्षीत अशा पध्दतीने बांधण्यात येणार आहेत. 

भुदरगड तालुक्याच्या शैक्षणिक कार्यात ही वसतीगृहे महत्वपुर्ण ठरणार असून मागसवर्गीय समाजातील मुला-मुलींच्या तसेच खुल्या प्रवर्गातील मुलां-मुलींच्या उच्च शिक्षणाला यामुळे मोठी चालणा मिळणार आहे. तसेच या दोन्ही वसतीगृहांच्या बांधकामाची सुरवात लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले. याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्य लाभले असून त्याबद्दल त्यांचे अभार मानले आहे.