जरांगे पाटलांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजू शकतो, असे सांगितले जात आहे.,यातच या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या विधानावर मनोज जरांगे यांनी स्पष्टीकरण देत, माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका, असे आवाहन केले आहे. 

आरक्षण दोन दिवस उशिरा मिळाले तरी चालेल. परंतु, सर्व शांततेने करू, असे विधान मनोज जरांगे यांनी केले आहे. यानंतर आता मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाची डेडलाईन बदलली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुसदमध्ये मनोज जरांगे, ओबीसी, धनगर आणि बारा बलुतेदार, अलुतेदार आणि भटके विमुक्त यांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यानंतर मनोज जरांगे यांनी आपल्या सदर वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. 

शब्दशः घेऊ नका, माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका

माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नाही. शब्दश: अर्थ घेऊ नका. समाज मोठा आहे, समाजासोबत संवाद साधताना बोली भाषेतील शब्द वापरणे गरजेचे असते. समाजाचा विश्वास संपादन करताना मराठवाड्याकडचे शब्द वापरले, दोन दिवस उशीरा याचा शब्दश: अर्थ घेऊ नका. डेडलाईन बदलण्याचा प्रश्नच नाही. बोलीभाषेतले शब्द वापरल्याने गैरसमज होऊ देऊ नका. २४ डिसेंबरची डेडलाईन कायम आहे. मराठा आणि ओबीसी आता एकत्रितपणे काम करणार आहे. यावर पुसदच्या बैठकीत चर्चा झाली. कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण हवे ही माझी भूमिका नाहीच. माझ्या तोंडी कोणतेही शब्द घालू नका. मला ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण हवे, असे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. 

दरम्यान, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी अशा नोंदी सापडत असून, आतापर्यंत राज्यातील ३५ लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे. कोणी कितीही विरोध केला तरी राज्यातील मराठ्यांना २४ डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षण मिळणारच, याचा पुनरूच्चारही जरांगे पाटील यांनी केला. शांततेच्या आंदोलनात मोठी ताकद आहे, शांततेच्या आंदोलनाने मराठा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणले आहे. त्यामुळे यापुढेही आणखी एकजूट दाखवा, शांत राहा, कुठेही उद्रेक किंवा जाळपोळ करू नका, कोणी कितीही उचकवण्याचा प्रयत्न केला तरी मराठा आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा, असा सल्लाही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.