बिद्री (प्रतिनिधी) बिद्री कारखान्यात सभासदांच्या हिताच्या कारभाराऐवजी स्वहिताचा कारभार सुरू आहे. कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांची एकाधिकारशाही ही सभासदांच्या उत्कर्षाला व कारखान्याच्या विकासाला मारक ठरत आहे. लय भारीची टिमकी वाजवणाऱ्या के. पी. पाटील यांचा कारभार हा सभासदांच्या हिताचा नव्हे, तर स्वार्थाचा आहे” असा घानाघात राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराच्या शुभारंभ सभेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी केला.

राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील गणपती मंदिराच्या आवारात झालेल्या या सभेत सर्वच नेत्यांनी सत्तारुढ आघाडीचे नेते माजी आमदार के. पी. पाटील यांच्या कारभारावर चांगलाच हल्ला चढविला. “परिवर्तन आघाडीला सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत असून यंदा कारखान्यात नक्की परिवर्तन होणार” असा विश्वासही यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पाटील व्यक्त केला.
खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही प्रचारसभा झाली.
यावेळी खासदार संजय मंडलिक म्हणाले, "कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केले पण त्या प्रयत्नांना के.पी पाटील यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. के पी पाटील यांचा कारभार एकाधिकारशाहीचा आहे. कारखाना कागल तालुक्यात आहे पण कागल तालुक्यातील कार्यक्षेत्रातील ऊस नेला जात नाही. कागलला कारखाना क्षेत्रातून हद्दपार करण्याचे षड्यंत्र केपी यांचे दिसते. सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी परिवर्तन आघाडी झाली आहे. परिवर्तन आघाडीसाठी यंदा अनेक शुभसूचक घटना घडल्या आहेत." शाहू
ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, "बिद्री कारखाना हा सभासदांच्या हातात सोपविण्यासाठी आमची लढाई आहे. कै. सदाशिवराव मंडलिक व स्वर्गीय विक्रमसिंग घाटगे यांच्या विचारधारेने खासदार संजय मंडलिक व मी एकत्र आलो आहोत. बिद्री कार्यक्षेत्रातील सभासदांचा बिद्री कारखानासाठी ऊस नेला जात नाही. यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाविषयी शंका येते. बिद्री कारखाना बिद्रीच्या सभासदांच्या साठी आहे की शेजारील खाजगी कारखान्याला ऊस पुरवठा व्हावा म्हणून त्यांचा कारभार सुरू आहे ? बिद्री कारखानाच्या निवडणुकीत यावर्षी परिवर्तन अटळ आहे.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले,” लोकांच्या अर्थकारणाला गती व बिद्रीच्या हिताचा कारभार हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून परिवर्तन आघाडीची रचना केली आहे. बिद्री कारखान्याच्या कामगाराचा मी मुलगा आहे. माझे वडील बिद्री कारखान्याचे कामगार होते.
यामुळे बिद्री कारखान्याच्या विकास प्रकल्पात अडचणी आणण्याचे पाप माझ्या हातून घडणार नाही. सत्ताधारी मंडळी सभासदांची दिशाभूल करत आहेत. का कारखान्याला साठ वर्षे झाली. मात्र कारखान्याचा विस्तार आणि विकास त्या गतीने झाला का ? सभासदांचा ऊस वेळेवर नेला जात नाही. मुदाळमधील पन्नास टक्के सभासदांचा उस उचलला जात नाही.
सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाचा फायदा सभासदांना होत नसेल तर तुमच्या सत्तेचा काय उपयोग ? तुम्ही लय भारी कारभाराची टिमकी वाजवता तर संचालक बाहेर का पडले ? असा खडा सवाल आबिटकर यांनी के पी पाटील यांना केला. राजकारणासाठी नव्हे तर सभासदांच्या उत्कर्षासाठी, लोकांच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी आम्ही बिद्री कारखान्याची निवडणूक लढवीत आहोत असेही आमदार आबिटकर यांनी सांगितले.
माजी आमदार अमल महाडिक म्हणाले, बिद्री कारखाना हा सभासदांच्या हातात राहावा यासाठी परिवर्तन आघाडी सोबत आहोत. कोल्हापूर दक्षिण व करवीर कार्य क्षेत्रातील गावांमधून परिवर्तन आघाडीला मताधिक्य देऊ.
तळाशीचे मारुती जाधव, कारखान्याचे विद्यमान संचालक बाबासाहेब हिंदुराव पाटील, चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील यांची भाषणे झाली.याप्रसंगी परिवर्तन आघाडीच्या सर्व उमेदवारांची ओळख करून देण्यात आली.
सभेला कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे प्रा. किसन चौगुले, नंदकुमार ढेंगे, शेतकरी संघाचे सुरेश देसाई, बाबुराव देसाई यांच्यासह पॅनलचे सर्व उमेदवार उपस्थित होते. मुरुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी सूत्रसंचालन केले. या प्रचार सभेला सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
