सत्तारूढ राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीस सभासदांचा प्रचंड प्रतिसाद

कौलव : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने परिसर ढवळून निघाला आहे. तीन पॅनल मध्ये लढत होत असली तरी सत्तारूढ राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीने सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेतली आहे. मतदारांमधून या पॅनेलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

आमजाई, व्हरवडे ,आवळे, आणाजे खि.व्हरवडे, गुडाळ, सिरसे, भोपळवाडी, बरगेवाडी, कौलव, घोटवडे व ठिकपुर्ली येथे मंगळवारी झालेल्या सभांना मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. स्थानिक नेत्यांनी आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष ए. वाय. पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण कुमार डोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत राजर्षी शाहू आघाडीचे सर्वच उमेदवार विजयी करण्याचा निश्चय व्यक्त केला.

यावेळी बोलताना आमदार पी.एन. पाटील म्हणाले या पाच वर्षाच्या आमच्या सत्तेच्या काळात कर्जाचा बोजा कमी केला आहे. को-जनरेशन प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा केली विरोधकांकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. आत्ता पासूनच ते चेअरमन पदासाठी भांडत आहेत असा आरोप केला. यावेळी पि.डी.धुंदरे, कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, किशाबापू किरुळकर, आमदार प्रा. किसन चौगुले आदी उपस्थित होते.