शिवशाहीर राजू राऊत यांना यंदाचा राज्य सरकारचा शाहिरी पुरस्कार

कोल्हापूर(प्रतिनिधी ):राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी (११ नोव्हेंबर ) केली. यामध्ये राज्य सांस्कृतिक पुरस्कार विभागातंर्गत शाहिरी क्षेत्रातील २०२३ चा पुरस्कार कोल्हापूरचे शिवशाहीर पुरुषोत्तम उर्फ राजेंद्र कृष्णाजी राऊत यांना जाहीर झाला आहे.

तीन लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे.राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागाने यंदा सर्वच पुरस्काराच्या रकमेत वाढ केली. राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम पूर्वी एक लाखाची होती. आत ती रक्कम तीन लाखाची करण्यात आली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कारामध्ये एकूण बारा प्रकारात पुरस्कार दिले जातात. राऊत यांनी या पुरस्कारासाठी कोणताही प्रस्ताव न पाठविता राज्य सरकारने त्यांच्या शाहिरी कलेचा गौरव केला आहे. गेली २७ वर्षे ते हा कलाप्रकार तळमळीने जोपासत आहेत. प्रचार आणि प्रसारासाठी सक्रिय आहेत. देशविदेशात शाहिरी, पोवाडयाचे कार्यक्रम केले आहेत.

उत्तरप्रदेश सरकारने १९९७ मध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कानपूर येथे महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवात सहभागी होताना राऊत यांनी, कोल्हापूरच्या वैभवशाली परंपरेच्या स्मरणार्थ लहरी हैदरसो, पिराजीराव सरनाईक व कृ. दा. राऊत यांच्या स्मरणार्थ पथकाची स्थापना केली. जवळपास सात स्पर्धा प्रथम क्रमांकाने जिंकल्या. शिवतीर्थ रायगड येथे सलग चौदा वर्षे शिवराज्याभिषेक सोहळयात सहभागी व सादरीकरण केले. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात तत्कालिन राष्ट्पती प्रतिभा पाटील यांच्यासमोर शाहिरी पोवाडयाचे सादरीकरण करण्यासाठी राज्य सरकारकडून आमंत्रित केले होते. शाहिरी संचासहित शिव-शाहू पथकाद्वारे मॉरिशस येथे शिवजयंती निमित्ताने कार्यक्रम केले आहेत. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ नेरुळतर्फे लोककलेतील पहिली ऑनररी डीलिट (डॉक्टरेट) पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. विविध संस्थाांनी शाहिरी क्षेत्रातील मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.

राजू राऊत विविध व्यवसायाशी निगडीत :

राऊत हे विविध क्षेत्राशी निगडीत आहेत. राऊत हे शाहिरी, पर्यावरण संवर्धन व शिल्पकार, चित्रकलेपासून ते फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी या व्यवसायाशी निगडीत आहेत. वडील कृ. दा. राऊत हे कोल्हापुरातील ख्यातनाम चित्रकार तसेच अष्टपैलू कलावंत म्हणून परिचित होते. वडिलांकडून लाभलेल्या चित्रकला व शिल्पकलेचा वारसा सांभाळत राजू राऊत यांनी माईलस्टोन पेटिंग आणि साईन बोर्डपासून होर्डिग, इलेक्शन बॅनर, थिएटर शो,भित्तीचित्रे, पोट्रेटसची निर्मिती केली आहे.