….तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना कोल्हापुरात येऊ देणार नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील थकीत असलेले उसाचे पैसे व यंदाच्या पहिल्या उचलीचा प्रश्न अद्यापही मिटलेला नाही. आमचे हक्काचे पैसे जिल्ह्यातील साखर कारखानदार लुटू पाहत आहेत. हे कारखानदार शेतकऱ्यांची खळी लुटत असतील तर मी स्वस्थ बसणार नाही. दि. १७ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना कोल्हापुरात येऊ देणार नाही. स्वाभिमानीचे कार्यकर्ते कोल्हापुरातील विमानतळाला घेराव घालणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले. दिवाळीच्या भाऊबिजेला शेतकऱ्यांच्या माताभगिनी साखरसम्राटांना खर्डा भाकरी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दि. ७ नोव्हेंबर पासून मागील वर्षी तुटलेल्या उसाला ४०० रूपये यंदाच्या गळीत होणाऱ्या उसाची पहिली उचल ३५०० रूपये द्या, या मागणीसाठी कार्यकर्त्यांसह राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. अद्यापही दरावर कोणताही तोडगा निघालेला नाही.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, जिल्ह्यात ऊस तोडी बंद आहेत. आम्ही शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे मागतो आहोत. कुणीही इथे व्यासपीठावर यावे, मी कधीही हिशेब सांगतो. साखर कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे बुडवत आहेत. आम्ही सदनशीर मार्गाने आंदोलन करत आहोत.

तरीही पोलीस आमच्यावरच गुन्हे दाखल करत आहेत. सरकारमधील मंत्री झोपा काढत आहेत काय? शेतकऱ्यांचे १२०० कोटी रूपये बुडवू पाहणाऱ्यांच्यावर पोलिस गुन्हे दाखल का करत नाहीत ? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करत आहेत. त्यांना आम्ही कोल्हापुरात येऊ देणार नाही.

कोल्हापुरातील विमानतळाला ऊस उत्पादक शेतकरी घेराव घालतील. तसेच शहरातील कार्यक्रमही आम्ही उधळून लावू, असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी दिला. टाकळीवाडी येथील शेतकऱ्यांनीही स्वतःहून ऊस तोडी बंद केल्या आहेत. दिवाळीपर्यंत आम्ही संयमाने आंदोलन करत आहोत. त्यानंतर मात्र सरकार व कारखानदारांना सळो की पळो करून सोडू. टप्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवू,असही शेट्टी यावेळी म्हणाले.

यावेळी सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, राम शिंदे, शैलेश आडके, सागर संभूशेटे, शैलेश चौगुले आदी उपस्थित होते.