ईडीने भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही?; आमदार बच्चू कडूंचा सवाल

मुंबई : ईडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांची चौकशी केली जाते. अशात या मुद्द्यावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी होत नाही. ईडीने भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही? असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या प्रश्नानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.जे खरं बोलतात त्यांच्या मागे ईडी लावली जाते, असं तुम्हाला वाटतं का? असं सवाल प्रसार माध्यमांनी बच्चू कडू यांना विचारला.

या प्रश्नाचं उत्तर देत बच्चू कडू म्हणाले, “सध्या तरी मी भारतीय जनता पक्षासोबत आहे. मात्र, तरी देखील भाजपवाल्यांना माझा सरळ प्रश्न आहे की भाजपच्या एकही नेत्याची ईडीने चौकशी का केली नाही?

त्यांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे. राष्ट्रवादी शरद पवार गट, ठाकरे गट त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांची ईडी चौकशी केली जाते. परंतु, भाजपच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी होत नाही.”

दरम्यान, राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उभारलेल्या आंदोलनानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधण्याचं काम राज्य सरकारने हाती घेतलं आहे.

जिल्हा पातळीवर हे काम सुरू करण्यात आलेलं आहे. अशात मराठवाड्यापेक्षा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अधिक कुणबी नोंद आढळून आल्या असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 5566 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. जिल्ह्यातील कागल व करवीर तालुक्यामध्ये सर्वाधिक कुणबी नोंदी आढळून आल्या आहे.