बालिंगा उपसा केंद्राचे त्वरित काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करा : आम. जयश्री जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऐन दिपावलीच्या काळात शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो आणि माता-भगिनी पाण्यासाठी वणवण फिरतात, ही बाब महापालिका प्रशासनास अशोभनिय आहे. त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. बालिंगा उपसा केंद्राचे काम त्वरित पूर्ण करून, शहराच्या पाणीपुरवठा सुरळीत करा अशा सूचना आमदार जयश्री जाधव यांनी दिल्या.

  आमदार जयश्री जाधव यांनी माजी महिला नगरसेविकांसह बालिंगा उपसा केंद्राला भेट देऊन, कामाची पाहणी केली व अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी माजी महापौर स्वाती येवलुजे, माजी नगरसेविका दीपा मगदूम, भारतीताई पवार, माधुरी लाड, उमा बनसोडे, पूजा नाईकनवरे, शोभा कवाळे, मेहजबीन सुभेदार, विक्रम जरग, करण शिंदे, शेखर पवार, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपजल अभियंता युनूस भेटेकर, शाखा अभियंता राजेंद्र हुजरे, जयेश जाधव, अभिलाषा दळवी आदी उपस्थित होते.

आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बालिंगा उपसा केंद्राची ही दुरावस्था झाली आहे. वेळीच दुरुस्तीची कामे केली असती तर ही परस्थिती निर्माण झाली नसती. परंतु आलेल्या परिस्थितीला ही सामोरे जावेच लागेल. आता बालिंगा उपसा केंद्राचे काम तात्पुरते स्वरूपाचे नको तर कायमस्वरूपी पूर्ण क्षमतेने सुरू राहील अशा पद्धतीने करा.

उपसा केंद्राच्या दुरुस्तीचे काम जोखमीचे आहे, तरीही युद्धपातळीवर काम करून, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करा अशी सूचना आमदार जाधव यांनी दिली तसेच जोखमीचे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.

🤙 8080365706