महादेव बुक बेटिंग अ‍ॅपवरुन भूपेश बघेल यांच्यावर निशाणा 

 

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचलनालयाने महादेव बुक बेटिंग अ‍ॅपप्रकरणी  समन्स बजावल्यामुळे याची देशभरात चर्चा सुरू झाली आहे.

अशातच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल  यांचेही याप्रकरणात नाव आल्यानंतर राजकारण तापलं आहे. याची दखल आता थेट पंतप्रधान मोदी यांनी घेतली आहे. छत्तीसडमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना पंतप्रधान मोदी यांनी महादेव बुक बेटिंग अ‍ॅपवरुन भूपेश बघेल यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने महादेव हे नाव सोडले नाही, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे.

छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुर्ग जिल्ह्यात निवडणुकीनिमित्त एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी ईडीने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याबाबत केलेल्या दाव्यांवरुन प्रश्न विचारला. ‘या घोटाळ्यातील आरोपींशी त्यांचे काय संबंध आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी छत्तीसगडच्या जनतेला सांगावे. पैसे जप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री संतापले आहेत. मी ऐकले आहे की नेते शांत आवाजात बोलत आहेत. मी शिव्यांना घाबरत नाही आणि मी तुम्हाला हमी देतो की मी भ्रष्टाचार करणाऱ्यांवर नक्कीच कारवाई करेन, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“यांनी तर महादेवाचे नावही सोडलेले नाही. दोन दिवसांपूर्वी रायपूरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त करण्यात आली आहे. हा पैसा सट्टेबाजांचा असल्याचे लोक सांगत आहेत. हा पैसा जुगार खेळणाऱ्यांसाठी आहे. जे त्यांनी छत्तीसगडच्या तरुणांना आणि गरिबांना लुटून जमा केले आहे. या लुटलेल्या पैशाने काँग्रेसचे नेते आपली घरं भरत आहेत. या पैशाचे धागेदोरे छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्याकडे जात असल्याचे माध्यमांमध्ये आलं आहे. दुबईत बसून घोटाळ्यातील आरोपींशी त्यांचा काय संबंध आहे हे त्यांनी सांगावे,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

“मी कोणतेही निवडणूक आश्वासन देत नाही, ही मोदींची हमी आहे. काँग्रेस गरिबांचा कधीच आदर करत नाही, गरीब त्यांच्यासाठी फक्त मतांपुरती आहे. मोदींना पाहिजे तेवढी शिवीगाळ करता येईल, पण ते संपूर्ण ओबीसी समाजाला का शिव्या देत आहेत? छत्तीसगडमधील हिंसाचार आणि गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम फक्त भाजपच करू शकते,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांचा पलटवार

‘हे लोक थेट लढू शकत नाहीत, ते ईडी आणि आयटीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. पंतप्रधान मोदी विचारत आहेत, दुबईच्या लोकांशी काय संबंध? मला त्यांना विचारायचे आहे की, तुमचे दुबईतील लोकांशी काय संबंध आहेत? लुकआउट नोटीस जारी करूनही अटक का झाली नाही? ही अटक करणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे. महादेव अॅप का बंद केले नाही? अॅप बंद करणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे,’ असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले.

🤙 8080365706