भुईबावडा घाटातील अपघातात चालक जागीच ठार

वैभववाडी (प्रतिनिधी) : चिऱ्याची वाहतूक करणारा मल्हारपेठ कळे (जि. कोल्हापूर) येथील ट्रक गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भुईबावडा घाटात २०० फूट खोल दरीत कोसळला. ट्रकखाली सापडून चालक सतीश आनंदा महाजन (४७) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा सुदर्शन सतीश महाजन (२२) हा बचावला असून, तो जखमी आहे.

मल्हारपेठ कळे (कोल्हापूर) येथील सतीश महाजन आणि त्यांचा मुलगा सुदर्शन हे दोघे आपल्या मालकीचा ट्रक (एमएच ०९ एफएल ७४४५) घेऊन  चिरे भरण्यासाठी फणसगाव (ता. देवगड) येथे आले होते. रात्री दहा वाजता ट्रकमध्ये चिरे भरून ते तळेरे-वैभववाडी येथून करुळघाटमार्गे न जाता एडगाव तिठ्यावरून भुईबावडा मार्गे कोल्हापूरला निघाले होते.

पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास भुईबावडा घाटातून गगनबावड्याकडे जात एका वळणावर सतीश यांचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे सुमारे २०० फूट खोल दरीत ट्रक कोसळला. त्यामध्ये चालक महाजन जागीच ठार झाले.

 करुळ घाटाची दुरवस्था झाल्यामुळे त्यांनी भुईबावडा घाटमार्गे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा तो निर्णय त्यांच्यासाठी आत्मघातकी ठरला. त्यामुळे ते करुळ घाटमार्गाच्या दुरवस्थेचा बळी ठरल्याची परिसरात चर्चा आहे.

अपघाताची माहिती पोलिसांना समजताच पोलीस अपघात स्थळी दाखल झाले. पोलिसांच्या साथीने सतीश यांचा ट्रकखाली अडकलेला मृतदेह तब्बल दीड-दोन तासांनंतर बाहेर काढण्यात त्यांना यश आले. जखमी सुदर्शन महाजन याला उपचारासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.