‘शाहू महाराज आमच्या पाठीशी ,आता नाही कुणाची भीती’ : मनोज जरांगे पाटील

जालना : अंतरवाली सराटी (जालना) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मंगळवारी दुपारी भेट दिली. याप्रसंगी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. ‘शाहू महाराज आमच्या पाठीशी ,आता नाही कुणाची भीती’ अशी भावना जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.

आंदोलन स्थळी श्रीमंत शाहू छत्रपती यांचे भाषण झाले. त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन शांततेत करावे असे आवाहनही त्यांनी केले. मराठा समाजाने मनोज जरांगे यांच्या पाठीशी राहिली पाहिजे. समाजामध्ये एकता येते तेव्हा ताकद वाढते आणि मराठा आरक्षणाचा उद्देश सफल होऊ शकतो असा विश्वासही शाहू महाराजांनी व्यक्त केला. सध्या आंदोलन तीव्र झाले असून जाळपोळ कोण करत आहे हे आपल्याला माहित नाही असे जरांगे पाटील यांनी सांगितले पण आरक्षणाचे आंदोलन हे शांततेने झाले पाहिजे. आंदोलनावर हिंसाचाराचा ठपका पडता कामा नये. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील युवक व कार्यकर्त्यांनी आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता जिवंत राहून मराठा आरक्षणासाठी जोमाने काम केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी सकल मराठा समाजाचे कोल्हापूर जिल्ह्यातील निमंत्रक वसंतराव मुळीक, व्ही. बी. पाटील, बाबा पार्टे ,बाबा इंदुलकर, दिलीप देसाई , मनोज जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.