कोल्हापूर (प्रतिनिधी) राधानगरी तालुक्यातील दूधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी हंगामासाठी कमी पाणी लागेल, अशा पिकांची निवड करावी. तसेच, काळम्मावाडी लाभक्षेत्रात ऊस लागवड करावी, पण गेल्यावर्षीपेक्षा जास्त असू नये, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या (उत्तर) अभियंता स्मिता माने यांनी एका प्रसिध्द पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, दूधगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सर्व शेतकरी, बागायतदार, सहकारी पाणीपुरवठा संस्थांना पाणी वापराबाबत विशेष सूचना दिल्या आहेत. दूधगंगा धरणात एकूण २५.४० टी.एम.सी. पाणी साठा करता येतो. गेल्यावर्षी दूधगंगा धरणाच्या गळतीच्या पार्श्वभूमीवर हाच पाणीसाठा २०.५४ टीएमसीपर्यंत ठेवला होता.
गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थितीमध्ये जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने शेतीला अपेक्षीत पाणी मिळाले नाही. यावर्षीही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची कमतरता होऊ नये, यासाठी धरणात एकूण पाणी २४.२२ टी.एम.सी. व त्यातील उपयुक्त पाणीसाठा २२.८२ इतका केला आहे. दरम्यान, सध्या धरणात २३.२५ टीएमसीपैकी २१.८५ उपयुक्त पाणीसाठा आहे. यातच दूधगंगा धरणाच्या गळती काढण्याच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. हे काम लवकरच सुरु केले जाणार आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी केला जाणार आहे. तरीही धरणामध्ये रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवश्यक पाणीसाठा ठेवला जाणार आहे. तरीही, शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामा करिता पिकांची निवड करताना कमी पाणी लागेल, अशा पिकांची निवड करावी.