साळवण प्रतिनिधी( एकनाथ शिंदे) : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याकडे 2023-24 च्या गळीत हंगामाकरीता 9 हजार 826 हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. कारखान्याने मागील गळीत हंगामात एफ.आर.पी. पेक्षा 147 रुपये जादा दर दिला आहे. एफ.आर.पी.पेक्षा जादा दर देण्याची कारखान्याची परंपरा येत्या गळीत हंगामामध्येही कायम ठेवण्यात येईल.
हंगामासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज झाली असून ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी आपण पिकवलेला संपूर्ण ऊस गळीतास पाठवून चालू गळीत हंगाम यशस्वी करावा असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 21 व्या गळीत हंगाम मुहूर्तप्रसंगी ते बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून 21 व्या गळीत हंगामाचा मुहूर्त करण्यात आला. संचालक सहदेव कांबळे व त्यांच्या पत्नी सौ.मंगल कांबळे यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास कारखान्याचे व्हा.चेअरमन बंडोपंत कोटकर, संचालक मानसिंग पाटील, खंडेराव घाटगे, जयसिंग ठाणेकर, दत्तात्रय पाटणकर, गुलाबराव चव्हाण, बजरंग पाटील, प्रभाकर तावडे, रविंद्र पाटील, संजय पडवळ, महादेव पडवळ, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, पांडुरंग पडवळ, रामा जाधव, उदय देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे, गणपत देसाई, आत्माराम ओटवणेकर, रविंद्र मडगांवकर, प्रज्ञा ढवण मुख्य कार्यकारी अधीकारी पी. एम. गावडे, गोकुळ संचालक बयाजी शेळके, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, माजी जि. प. सदस्य संभाजी पाटणकर, कार्यकारी संचालक जयदिप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील यांच्यासह सभासद, शेतकरी, खातेप्रमुख, बँक स्थायी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत कार्यकारी संचालक जयदिप पाटील यांनी केले. आभार सेक्रेटरी नंदू पाटील यांनी मानले.
