सिंधुदुर्ग लोकसभेची जागा रवींद्र चव्हाण लढवणार?

कल्याण: डोंबिवलीचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नमो रमो नवरात्री दांडिया आणि गरबाचे आयोजन केले होते. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, आपल्याला देशभरात एनडीएचे जवळजवळ ४०५ खासदार निवडून आणायचे आहेत. त्यामधील एक खासदार कल्याण लोकसभेचा असला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. आपण दर वेळेला सहकार्य करता. या वेळेला हे मताधिक्य मोठे असले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणि देवेंद्रजींनी आपल्या सर्वांना ही विनंती केली आहे. हा महाराष्ट्र उत्तरप्रदेश नंतर सर्वात जास्त खासदार देणारे राज्य आहे. त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण काम करूया, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दसऱ्याच्या दिवशी ‘एक्स’वरून त्यांनी आपल्या या निर्णयाची घोषणा केली. या निर्णयाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद उमटले. निलेश राणे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी कणकवली येथे मोठी गर्दी केली.

सिंधुदुर्ग लोकसभेसाठी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा :

या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग लोकसभेची जागा आता रवींद्र चव्हाण लढवू शकतात, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, याविषयी रवींद्र चव्हाण यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ही सगळी चर्चा सुरु असताना बुधवारी सकाळी रवींद्र चव्हाण अनपेक्षितपणे नीलेश राणे यांच्या भेटीसाठी पोहोचले. राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यावर रवींद्र चव्हाण आणि नीलेश राणे यांच्यात तीन तास चर्चा झाली. त्यानंतर नीलेश राणे हे रवींद्र चव्हाण यांच्यासोबत गाडीत बसून बाहेर पडले. हे दोघे नेमके कुठे गेले, त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समोर येऊ शकलेला नाही.

🤙 9921334545