दसरा मेळाव्यावरून सुषमा अंधारे यांचा शिंदे गटाला खोचक टोला…

मुंबई : शिवसेना पक्ष फूटल्यानंतर होणाऱ्या दोन्ही गटांच्या दुसऱ्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे.

दोन्ही गटांच्या मेळाव्यासाठी एक लाखापेक्षा जास्त शिवसैनिक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 दोन्ही गट या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करणार आहेत. ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा मुंबईतल्या प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज पार्क (दादर) येथे होणार आहे. तर दक्षिण मुंबईतल्या आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा पार पडणार आहे.

या दसरा मेळाव्यावरून दोन्ही गट एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. “आमचा मेळावा आहे, बाकीच्या इ्व्हेंटचं आम्हाला काही माहिती नाही. लोकांनी इव्हेंटला यावं यासाठी त्यांनी गाड्या पाठवल्या असतील, आम्ही आमच्या मेळाव्यासाठी गाड्या पाठवलेल्या नाहीत”, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, मुंबईतला दसरा मेळावा एकच असतो, बाकी इव्हेंटचं मला माहिती नाही. शिवसैनिकांनी मेळाव्याला यावं यासाठी आम्ही महाराष्ट्रभर गाड्या पाठवलेल्या नाहीत. ना गाड्या पाठवल्या, ना आमदार, खासदारांवर गर्दी जमवण्याची जबाबदारी दिली. लोकांनी यावं यासाठी कुठेही अतिरिक्त व्यवस्था केलेली नाही. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या उद्धव ठाकरे यांचं मार्गदर्शन ऐकायला, त्यांच्या विचारांचं सोनं लुटायला संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक शिवतीर्थावर येत आहेत.

सुषमा अंधारे म्हणाल्या, चांद्यापासून बांद्यापर्यंतचे शिवसैनिक आपल्या कष्टाची भाकरी घेऊन शिवतीर्थावर पोहचतायत. तसेच आम्ही सगळे शिलेदार शिवसैनिकांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं उत्साहवर्धक मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सूक आहोत.