मुंबई :शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे.या दसरा मेळाव्याचा पहिला टीझर शिंदे गटाकडून जारी करण्यात आला आहे. “शिवसेनेचे एकच तत्व, साहेबांचं हिंदुत्व, साहेबांचं शिष्यत्व! शिवसेनेचा दसरा मेळावा… चलो आझाद मैदान… टीझर प्रकाशित” असं ट्विट नरेश म्हस्के यांनी केलं आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटांनी यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान मिळावं यासाठी मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली. पण यंदाही शिवतीर्थ मैदान ठाकरे गटालाच मिळालं. या प्रकाशित टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाची एक ऑडिओ क्लिप आहे. यासोबतच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा… असा उल्लेख देखील करण्यात आला आहे.
गेल्यावर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा शिंदे आणि ठाकरे गटामधील वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या दरवाजापर्यंत गेला होता. न्यायालयाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय दिल्याने शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा मेळावा झाला होता. तर, वांद्रे येथील बीकेसीमध्ये शिंदे गटाचा मेळावा झाला. त्यामुळे यंदा हा वाद उभा राहतो का, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण शिंदे गटाने यंदा आझाद मैदानावर दसरा मेळावा घेण्याचे ठरविल्याने शिवतीर्थावर ठाकरे गटाचा मेळावा होण्याचे निश्चित झाले.आता आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत शिंदे गटाने टीझर जारी केला आहे.
