मुंबई : शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या युवासेनेच्या कार्यकारिणीतील काही सदस्यांवर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी या नवीन शिलेदारांना त्यांची नियुक्तीपत्रे देऊन ही निवड घोषित केली.
युवासेनेच्या कार्याध्यक्षपदी पूर्वेश प्रताप सरनाईक यांची, युवासेना सरचिटणीसपदी राहुल कनाल आणि अमेय घोले यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष आणि संघटना तळागाळात पोहचवण्यासह, सरकारच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
राहुल कनाल आहेत तरी कोण ?
आदित्य ठाकरेंची कोअर कमिटी ही युवासेनेची ताकद मानली जाते. या कोअर कमिटीतील आणि आदित्य ठाकरे यांची एकदम जवळची विश्वासू व्यक्ती म्हणून राहुल कनाल यांची ओळख होती. ते मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य होते. युवा सेनेचे सक्रिय पदाधिकारी मानले जात. महाविकास आघाडीची सत्ता असताना शिर्डी देवस्थान समितीवर ते सदस्य राहिले आहेत.विराट कोहली आणि सलमान खान यांच्यासारख्या सेलिब्रिटींसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. दिशा सॅलियन आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणाशी राहुल कनाल यांचे संबंध जोडण्यात आले होते. पण त्यातही पुढे फार काही झालं नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी नवीन शिलेदारांना नियुक्तीपत्रे देऊन निवड घोषित केली. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम हेदेखील उपस्थित होते.