पुणे: महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा बांधवांच्या आरक्षणाचा घास जवळ आला आहे. त्यांच्या पाठीवर जुन्याजाणत्या मराठा नेत्यांनी शाबासकीची थाप द्यायला हवी. त्यांनी भावनाशून्य होऊन वागू नये. गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणचा घास जवळ आला असताना या नेत्यांनी अन्नात माती कालवू नये, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी भाजप खासदार नारायण राणे यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात नारायण राणे यांच्या एकसदस्यीय समितीने मराठा आरक्षणासाठीचा अहवाल तयार केला होता. मराठा आरक्षणाच्या आजवरच्या लढ्यात राणे समितीचा हा अहवाल प्रमाण मानला गेला. मात्र, आता मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणी लावून धरल्यानंतर नारायण राणे यांनी त्याला विरोध केला आहे. मी ९६ कुळी मराठा आहे, कुठलाच मराठा कुणबी दाखला घेणार नाही, अशी ठाम भूमिका नारायण राणे यांनी घेतली होती. राणेंच्या या वक्तव्याला मनोज जरांगे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.