करून गेलो गाव ‘ नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : दसरा चौक येथे शाहू दसरा कोल्हापूरचा महोत्सवाअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.याअंतर्गत ‘ करून गेलो गाव ‘ या नाटकाचा प्रयोग पार पडला. या नाटकाला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हास्य जत्रा फेम ओंकार भोजने आणि चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांच्या अभिनयातून साकारलेल्या या विनोदी नाटकाला कोल्हापूरकरांनी भरभरून दाद दिली.

कोकणातलं एक गाव तिथले अण्णा म्हणजे सरपंच भाऊ कदम, त्यांची बायको, गंपू मास्तर ,गावातली अन्य इरसाल मंडळी या पात्रांनी प्रेक्षकांवर अक्षरशः छाप सोडली.या नाटकामध्ये अपक्ष आमदार पुन्हा निवडून येण्याच स्वप्न पाहतो. प्रथमच गावात मुख्यमंत्री येणार आहेत तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या मनोरंजनासाठी गावातल्या लोकांचा पारंपारिक कार्यक्रम न ठेवता नटरंगी नाच कार्यक्रम ठेवण्यावर आमदार ठाम राहतो यातून घडणाऱ्या घडामोडींची मांडणी उत्कृष्टरित्या या नाटकात करण्यात आली आहे.