ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बुधवारी ठाण्याच्या टेंभी नाका येथील नवरात्रौत्सवाला भेट दिली. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर गेल्या वर्षीपासूनच या ठिकाणी ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत देवीचे दर्शन घेतले जाते. मात्र यावेळी रश्मी ठाकरे येताच देवीच्या मंडपातील पंखे, साऊंड आणि कूलर बंद झाले, असा आरोप ठाकरे गटातील महिलांनी केला.
टेंभी नाका येथील नवरात्रौत्सवाला दररोज राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर भेट देत देवीचे दर्शन घेतात. गेल्या वर्षी शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटातील वाद विकोपाला गेल्यानंतर या ठिकाणी रश्मी ठाकरे दर्शनासाठी येणार होत्या. त्यामुळे प्रचंड तणावाचे वातावरण होते. पोलीस यंत्रणेवरही ताण पडत होता.
यंदाही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ टेंभी नाका परिसरात घोषणाबाजी केली. त्यानंतर रश्मी ठाकरे यांनी देवीचे दर्शन घेत मनोभावे पूजा केली. त्यानंतर त्यांनी श्रीरंग, लुईसवाडी, शिवसेनेच्या (ठाकरे गट) चंदनवाडी शाखेतील उत्सवाला भेट देत देवीचे दर्शन घेतले.