आजची करवीर निवासिनी अंबाबाईची पूजा श्री कामाक्षीदेवी रूपातील


कोल्हापूर : आज अश्विन शुक्ल तृतीया अर्थात सतरा ऑक्टोबर 2023 शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची कांची कामाक्षी रूपात अलंकार पूजा साकारण्यात आली आहे. दक्षिण भारतातील कांची हे शैव वैष्णव शाक्त अशा अनेक परंपरांसाठी आदराचे स्थान आहे.

शिवकांची विष्णू कांचीच्या रूपाने येथे भगवान शंकरांचे आणि नारायणाचे असे मंदिर आहे तसेच आदिशक्तीच्या पराशक्ती रूपाचे अर्थात कामाक्षी देवीचे सुद्धा मंदिर आहे. मदनाच्या राखेतून जन्मलेल्या भंडासूर नावाच्या राक्षसाचा संहार करायला आदिशक्तीने भगवती ललितेचा अवतार धारण केला .

श्रीचक्र रुपी रथावरती विराजमान होऊन जगदंबेने भंडासुराचा वध केला. सर्व जगत आनंदात असताना मदनाच्या विरहाने व्याकुळ झालेल्या रतीने मातेला आपला पती पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली त्याला अनुसरून भगवतीने केवळ आपल्या नेत्र कटाक्षाने मदनाला पुन्हा सजीव केले म्हणून तिला कामाक्षी म्हटले जाते अशी ही कथा प्रचलित आहे .

उजव्या खालच्या हातात लाल कमळ निळकमळ निळकमळ आंब्याचा मोहर आंब्याचा मोहोर अशोकाची फुले आणि मोगऱ्याची फुलं अशा पाच फुलांचे बाण( त्यावर रूंजी घालणारा पोपट) धारण करून उजव्या वरच्या हातामध्ये अंकुश डाव्या वरच्या हातात डाव्या खालच्या हातामध्ये मनाचे प्रतिक रूप असणारा उसाचे धनुष्य अशी चार आयुध धारण करणारी ही जगदंबा श्री चक्राची अधिष्ठात्री देवता म्हणून ओळखली जाते भक्तांना भक्ती मुक्ती देणाऱ्या जगदंबा कामाक्षीच्या रूपात सजलेली महालक्ष्मी अर्थात अंबाबाई आपल्या सर्वांच्या देखील मनोकामना पूर्ण करो हीच तिच्या चरणी प्रार्थना!
श्रीमातृ चरणारविंदस्य दास प्रसन्नसशक्तिकः