नागपूर : गडकरी यांचे व्यक्तिमत्त्व प्रसिद्ध अभिनेता राजकपूरसारखे आहे. राज कपूर कधी छोटे स्वप्न बघत नव्हते. गडकरीसुद्धा छोटे स्वप्न कधी पाहत नाहीत आणि हाती घेतलेले प्रत्येक काम देहभान हरपून पूर्ण करतात. त्यांच्यावरील चित्रपटामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे नवीन पिढीपर्यंत पोहोचतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सोमवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ चित्रपटाचा ‘टिझर’ फडणवीस यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट २७ ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गडकरींमधील कामाचा झपाटा आणि ते पूर्ण करण्यासाठी असलेली क्षमता प्रत्येकाने आत्मसात करावी.
मुंबई-पुणे एक्प्रेस हायवे पूर्ण करण्याचे त्यांचे कार्य जगासमोर आदर्श म्हणून बघितले जाते. पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा ‘रोडमॅप’ तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. यावेळी प्रसिद्ध क्रिकेटपटू उमेश यादव याचे भाषण झाले. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी गडकरींच्या कामाचे विशेष कौतुक केल्याचे सांगितले.