मुंबई: प्रसारमाध्यमांपुढे बेताल बडबड करणारे भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहेत.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी नितेश राणे यांच्याविरुद्ध माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने समन्स जारी केले आहे.
21 नोव्हेंबरला न्यायालयात व्यक्तिशः हजर राहा, असे सक्त आदेश दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे नितेश राणेंना मोठा झटका बसला आहे.
महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार… खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असे निराधार दावे करीत नितेश राणे सैरभर बरळले होते. त्यांनी मे महिन्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांच्याबाबत बदनामीकारक विधाने केली. याप्रकरणी संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्याविरुद्ध माझगाव दंडाधिकारी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यावर सोमवारी महानगर दंडाधिकारी संग्राम काळे यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी खासदार संजय राऊत यांच्यातर्फे ऍड. मनुजा पिंगळे आणि ऍड. त्रिश बोस यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादाची गंभीर दखल घेत न्यायालयाने नितेश राणे यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास सहमती दर्शवली. त्याच अनुषंगाने नितेश राणे यांना तातडीने समन्स बजावून 21 नोव्हेंबरला न्यायालयात व्यक्तिशः हजर राहण्याचा आदेश महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे नितेश राणे हे कायद्याच्या कचाटय़ात सापडले आहेत.
पोलिसांपुढे जबाब देण्यास टाळाटाळ
संजय राऊत यांच्या तक्रारीला अनुसरून दंडाधिकाऱ्यांनी मागील सुनावणीवेळी पोलिसांचा अहवाल मागवला होता. न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून पोलिसांनी अहवाल सादर केला आहे. नितेश राणे यांनी तपासात असहकार्य केल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. संजय राऊत यांनी तक्रारीत केलेले आरोप सत्य आहेत. या प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी नितेश राणे यांना दोनदा बोलावले होते. मात्र ते हजर राहिले नाहीत. जबाब नोंदवण्यास त्यांनी टाळाटाळ केली, असे पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे नितेश राणे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.